शिक्षण विभागाकडून मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शनिवार, ४ ऑक्टोबर ते सोमवार, ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची, नवीन नोंदणी करण्याची आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. राज्यात यावर्षी संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने (CAP) राबविण्यात येत आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ मध्ये दुरुस्ती करण्याची, तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत (ATKT) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करण्याची परवानगी मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्राधान्यक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली नाही तर अशा विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात रिक्त जागांनुसार पुन्हा विकल्प बदलण्याची सुविधा दिली जाणार आहे. परंतु, ज्यांनी प्राधान्यक्रम नोंदवलेले नाहीत त्यांना allotment मिळणार नाही.
अकरावी प्रवेशाची आकडेवारी पाहिली तर, आतापर्यंत राज्यभरातील ९,५५० कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण १४,८८,५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ११,७२,९९७ विद्यार्थ्यांनी CAP प्रक्रियेतून प्रवेश घेतला असून, १,६९,४४१ विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे एकूण १३,४२,४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे.
या अतिरिक्त संधीबाबत माहिती देताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल तेथे जाऊन प्रवेश निश्चित करण्याचे वेळापत्रक मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी आता उशीर न करता ऑनलाइन नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चित करून आपले भविष्य सुरक्षित करणे आवश्यक आहे. ही संधी हीच अंतिम असल्याने, इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेत त्वरित सहभाग घ्यावा.




