मराठवाड्यातील शिक्षकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी १ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीद्वारे राज्यभरात एकूण २,४१० पदांची निवड होणार असून, मराठवाडा विभागासाठी ४५७ जागा आरक्षित आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर ही परीक्षा पुन्हा जाहीर झाल्यामुळे हजारो शिक्षक यासाठी उत्सुक आहेत.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, २०२३ मध्ये या पदासाठी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे २०२३ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना यंदा पुन्हा संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची तारीख ८ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान होती. नवीन उमेदवार २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात, तर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.mscepune.in
या पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांनी किमान सहा वर्षांची अखंडित सेवा पूर्ण केली पाहिजे. उमेदवार ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे, त्याच जिल्ह्यातील पदासाठी निवडीस पात्र राहणार आहे.
परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन असून, एकूण २०० गुणांची असेल. त्यापैकी १०० गुण बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीसाठी; तर उर्वरित १०० गुण शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचारप्रवाह या विषयांवर असतील.
मराठवाड्यातील जागा: संभाजीनगर-68, परभणी-43, बीड-78, हिंगोली-34, जालना-55, लातूर-52, धाराशिव-40, नांदेड-87. एकूण ४५७ पदे.
ही संधी मराठवाड्यातील शिक्षकांसाठी नवे करिअर उघडणारी आहे. पात्रतेसह अर्ज करून आपण या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकता.




