MPSC उत्तरपत्रिकेत मोठे बदल करण्यात आले असून, हे बदल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची दिशा बदलणारे ठरणार आहेत. MPSC नवीन नियम 2026 अंतर्गत आता उत्तरपत्रिकेची रचना, पर्यायांची संख्या आणि नेगेटिव्ह मार्किंगचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. विशेष म्हणजे चार ऐवजी पाच पर्याय, उत्तरपत्रिकेचे दोन भाग आणि अधिक गोपनीय मूल्यमापन प्रणाली यामुळे उमेदवारांनी परीक्षेची तयारी नव्याने आखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व MPSC परीक्षांसाठी हे नियम लागू होणार असल्याने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उत्तरपत्रिका दोन भागांत विभागली जाणार

नवीन पद्धतीनुसार MPSC ची उत्तरपत्रिका आता दोन स्वतंत्र भागांत असेल.
भाग–१ हा केवळ उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी वापरायचा असेल.
भाग–२ मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी असा वैयक्तिक तपशील असेल. ही रचना प्रथमच राबवली जात असून, ती मूल्यमापन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता

परीक्षा पूर्ण झाल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेचा भाग–१ आणि भाग–२ वेगळे करतील. त्यामुळे उत्तरपत्रिकेची तपासणी करताना तपासकांना उमेदवाराची ओळख कळणार नाही. यामुळे मूल्यमापन प्रक्रिया अधिक निष्पक्ष आणि गोपनीय होणार असल्याचे MPSC ने स्पष्ट केले आहे. हा बदल मेरिट आधारित निवड प्रक्रियेला अधिक बळ देणारा आहे.

चार ऐवजी पाच पर्याय

नवीन नियमांनुसार प्रत्येक प्रश्नासाठी आता चार ऐवजी पाच पर्याय असतील. हा पाचवा पर्याय विशेषतः “उत्तर माहित नाही” अशा परिस्थितीसाठी देण्यात आला आहे. उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर देऊ नये असे वाटल्यास पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाच पैकी किमान एक तरी वर्तुळ छायांकित करणे बंधनकारक असेल.

पर्याय न निवडल्यास होणार नेगेटिव्ह मार्किंग

जर उमेदवाराने एखाद्या प्रश्नासाठी पाच
पैकी एकही पर्याय निवडला नाही, तर त्या प्रश्नासाठी २५% (१/४) गुण वजा केले जातील. म्हणजेच “प्रश्न सोडून दिला” तरी त्याला गुणकपात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय किंवा किमान पाचवा पर्याय निवडणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

बैठक क्रमांकाच्या नियमात बदल

MPSC परीक्षेतील उमेदवारांचा बैठक क्रमांक आता ८ अंकी ऐवजी ७ अंकी असणार आहे. विशेष बाब म्हणजे, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहील. त्यामुळे पुढील टप्प्यांमध्येही हाच बैठक क्रमांक वापरला जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. pic.twitter.com/LaCwmQ6G27

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 24, 2025

नेगेटिव्ह मार्किंगचे नियम अधिक कडक

नवीन पद्धतीनुसार खालील प्रत्येक चुकीसाठी २५% किंवा १/४ गुण वजा केले जातील: चुकीचे उत्तर देणे, एकापेक्षा जास्त पर्याय निवडणे, कोणताही पर्याय न निवडणे, उत्तरात खाडाखोड किंवा दुरुस्ती करणे. तसेच, एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात (Decimal) आली तरी ती जशीच्या तशी ग्राह्य धरली जाणार आहे.

उत्तरपत्रिका कधी ‘अवैध’ ठरेल?

MPSC ने स्पष्ट केले आहे की काही गंभीर चुका झाल्यास उमेदवाराची उत्तरपत्रिका थेट अवैध (Invalid) ठरवली जाऊ शकते. यामध्ये विहित ठिकाणी स्वाक्षरी न करणे, काळ्या बॉल पॉईंट पेनशिवाय इतर पेन वापरणे, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर किंवा चिन्हे लिहिणे, प्रश्नपुस्तिका क्रमांक न नमूद करणे, तसेच उत्तरपत्रिकेवरील QR कोड किंवा टाइमिंग ट्रॅक खराब करणे या बाबींचा समावेश आहे.

नवीन नियमांची अंमलबजावणी कधीपासून?

MPSC कडून उत्तरपत्रिकेत करण्यात आलेले सर्व सुधारित नियम आणि नवीन उत्तरपत्रिका पद्धत १ मार्च २०२६ पासून आयोजित होणाऱ्या सर्व भरती परीक्षा आणि निवड प्रक्रियांना लागू होईल. उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी उत्तरपत्रिकेच्या कार्बनलेस कॉपीच्या मागील बाजूस सविस्तर सूचना दिल्या जाणार असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.