मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात सध्या राज्यभरात वयोमर्यादेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परीक्षा जवळ आली असताना सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हजारो उमेदवार मानसिक तणावाखाली आहेत.

या परीक्षेची जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झाली असून ती तब्बल सात महिने उशिरा आल्याने अनेक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. वयोमर्यादा ठरवताना 1 नोव्हेंबर 2025 ही कट-ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेच्या आधारावर काही दिवसांच्या फरकाने अनेक उमेदवार अपात्र ठरले असून, त्यामुळे वयोमर्यादेत शिथिलता देण्याची मागणी जोर धरत आहे.

या भरती प्रक्रियेत एकूण 674 पदे असून त्यापैकी 392 पदे पोलिस उपनिरीक्षक (PSI) संवर्गातील आहेत. PSI पदासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करत असल्याने, या वयोमर्यादेच्या अटीमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी दिसून येत आहे.

यापूर्वी राज्य सरकारने पोलिस शिपाई भरती तसेच MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी एक वर्षाची वयोसवलत दिली होती. त्यामुळे त्याच धर्तीवर 2025 च्या गट-ब परीक्षेसाठीही वयोमर्यादा शिथिल करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात अनेक आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून पाठपुरावा केला आहे.

दरम्यान, MPSC कडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर करण्यात आली आहेत. आयोगाने वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून, प्रवेशपत्रांशिवाय कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर असताना शासनाचा निर्णय प्रलंबित राहिल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.