महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC ची गट-ब (Group B) संयुक्त पूर्व परीक्षा आणि राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी नेट (UGC NET) परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. आयोगाच्या नियोजनातील या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना आता एका महत्त्वाच्या परीक्षेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने आपल्या नियोजित वेळापत्रकात बदल केला. २१ डिसेंबर रोजी होणारी गट-ब परीक्षा पुढे ढकलून ती ४ जानेवारी रोजी घेण्याचे आयोगाने सोमवारी जाहीर केले. मात्र, हा निर्णय घेताना आयोगाने त्याच दिवशी असलेल्या इतर राष्ट्रीय परीक्षांचा विचार केला नसल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान देशभरात ‘यूजीसी नेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नेमकी ४ जानेवारीलाच नेटचा पेपर आणि एमपीएससी गट-ब ची परीक्षा आल्याने ‘नेमकी कोणती परीक्षा द्यायची?’ असा यक्षप्रश्न उमेदवारांसमोर उभा राहिला आहे. अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेसोबतच शैक्षणिक क्षेत्रातील करिअरसाठी (प्राध्यापक होण्यासाठी) नेट परीक्षेची तयारी करतात. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा असल्याने त्यांना नाईलाजाने एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे.

पुनर्नियोजन करताना आयोगाने इतर परीक्षांचा विचार करायला हवा होता, असे मत विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा संघटना व्यक्त करत आहेत. या गोंधळामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांवर मानसिक ताण आला आहे. आता आयोग यावर काही तोडगा काढणार की विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.