महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात धक्कादायक घटना घडली असून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांविना रिकामी राहिली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे याच जिल्ह्याचे असल्याने ही बाब विशेषत्वाने चर्चेत आली आहे. शाळेत एकूण २३२ विद्यार्थी असून सोमवारी एकाही विद्यार्थ्याने हजेरी लावली नाही. पालकांनी शिक्षक बदल्या धोरणाविरोधात शाळेचा बहिष्कार पुकारला आहे.

या शाळेत पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करत होते, परंतु अलीकडील बदली प्रक्रियेमुळे त्या शिक्षकांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी अशा शिक्षकांची नियुक्ती झाली आहे जे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. पालकांनी असा आरोप केला आहे की सेवानिवृत्तीकाळ जवळ असलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या विकासात सातत्य राहणार नाही आणि त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल. त्यामुळे पालकांनी एकमताने निर्णय घेत शाळा बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.

हे वाचा

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता बोस यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. पालकांची मागणी आहे की किमान ५० टक्के जुने शिक्षक परत नेमण्यात यावेत आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्ववत करावे. राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात आधुनिक बदल, CBSE पॅटर्न, डिजिटल शिक्षण यांसारख्या उपक्रमांवर भर देत आहे, परंतु प्रत्यक्षात शिक्षक बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेने शिक्षण व्यवस्थेतील विसंगती आणि धोरणांतील त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना चांगल आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे. आता पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचा