महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी घडामोड झाली आहे. राज्यातील MBBS आणि BDS प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतरही शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, MBBS अभ्यासक्रमात ३८७ तर BDS मध्ये तब्बल ५०८ जागा अद्याप भरल्या गेल्या नाहीत. विद्यार्थ्यांनी allotment मिळूनही प्रवेश नाकारल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
तिसऱ्या फेरीत राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ६०६ जागांसाठी प्रवेश देण्यात आला होता. मात्र, त्यापैकी फक्त २१९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. त्यात १०१ विद्यार्थी सरकारी महाविद्यालयात आणि ११८ विद्यार्थी खासगी महाविद्यालयात दाखल झाले. परिणामी ३८७ MBBS जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये ३७ जागा सरकारी, तर ३५० जागा खासगी महाविद्यालयांच्या आहेत.
पहिल्या फेरीत ८,१३८ जागांपैकी ६,८४८ जागांवर प्रवेश पूर्ण झाला होता, तर दुसऱ्या फेरीत १,२९० जागा शिल्लक होत्या. या दरम्यान राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) राज्यातील काही महाविद्यालयांना अतिरिक्त २०० जागांची मान्यता दिली. त्यामुळे दुसऱ्या फेरीत एकूण १,४९० जागांसाठी प्रक्रिया पार पडली.
दंतवैद्यक (BDS) अभ्यासक्रमातही परिस्थिती काही वेगळी नाही. तिसऱ्या फेरीअखेर ८९१ जागा रिक्त होत्या, त्यापैकी फक्त ३८३ जागा भरल्या गेल्या आणि ५०८ जागा अजूनही रिक्त आहेत. यामध्ये २६ सरकारी आणि तब्बल ४८२ खासगी महाविद्यालयांच्या जागा आहेत.
तिसऱ्या फेरीदरम्यान नवीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने चौथ्या फेरीत जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी असली तरी खासगी महाविद्यालयांच्या शुल्क व पारदर्शकतेबाबत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) लवकरच चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.






